4 मे आजच्याच दिवशी बॉम्बेच नाव बदलून मुंबई करण्यात आल.मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. पोर्तुगीजांच्या बोम बाहीयाचे इंग्रजांनी बॉंबे केले. मुंबई, बम्बई आणि बॉंबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. १९९५ मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.
१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली.१९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याची राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
१९७० च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बम्बई (हिंदी भाषा) व बॉम्बे) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले.