Type Here to Get Search Results !

नाव दिबांचे नाही, नाही बाळासाहेबांचे..., विमानतळाला नाव अटलबिहारी वाजपेयींचे ?


ठाकरे सरकारवर कुरघोडी  करण्याच्या केंद्राच्या सुप्त हालचाली


कांतीलाल कडू

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचे वादळ 2015 पासून लोकसभेच्या सभागृहात घोंगवायला सुरुवात झाल्यानंतर 2021 मध्ये अचानक राज्य सरकारने हिंदूहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे आणले, तशी स्थानिक अस्मिता जागी झाली आणि पुन्हा दिबांच्या नावाचा जागर सुरू झाला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांना मिठीत घेत 'आपण भाऊ भाऊ, मिळून सारी सिडको खाऊ', असा नाट्यप्रयोग सुरू केला. परंतु केंद्र सरकारच्या अर्थात भाजपाच्या मनात दिबा, बाळासाहेब यांच्याविषयी ठासून आकस असल्याने आणि राज्यातील 105 आमदारांना सत्तेपासून दूर फेकून महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने त्याचे उट्टे काढत विमानतळाला दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे ठरले असल्याची माहिती मिळते. वाजपेयी हे अजातशत्रू असल्याने त्यांच्या नावाला विरोध होणार नसल्याने आणि याच मतदार संघाने त्यांचे सरकार पडल्याच्या घटनेचा बदला घेत हा डाव टाकण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यात स्थानिक अस्मितेला खूप महत्व आहे. मग प्रादेशिक पक्ष असोत की राजकीय नेते, तेथील संस्कृती, बोलीभाषा, चालीरीती, प्रादेशिक खेळ साऱ्यांना अनन्य साधारण महत्व असते. त्याच अस्मितेला अंकुर फुटल्याने स्थानिक समाजातील प्रज्ञावंंत, बुद्धिजीवी, लढवय्ये, व्यासंगी, उच्चशिक्षित आणि गरिबांची कणव असलेले एकमेव नेते दि. बा. पाटील नावाचे नेतृत्व समाजिक आरोग्य सुदृढ़ीकरणासाठी तब्बल पाच दशकाहून अधिक काळ अनेकांचे कर्दनकाळ बनून राहिले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सर्वच क्षेत्राला स्व: विचारांचे अधिष्ठान देत विखुरलेल्या समाजाची त्यांनी मोट बांधली आणि समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे भागीरथी प्रयत्न केल्याने दि. बा. नावाची अस्मिता आगरी, कोळी समाजासह बारा बलुतेदार आणि इतर मागासवर्गीयांमध्ये ध्रूर्व ताऱ्यासारखी अढळ बनून राहिली आहे.
शेतजमीनीला किमान बाजारभाव द्यावा म्हणून तत्कालीन राज्य सरकारविरोधात 1984 साली शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्यात उरण परिसरात वेगवेगळ्या शौर्यभूमीवर पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यातून दि. बा. नावाचे नेतृत्व सोन्यासारखे देशभर चमकत राहिले. सरकारला पाऊल मागे घ्यावे लागले. पुढे मग, पाच काय पन्नास हुतात्मे देण्याची तयारी असल्याचा इशारा सरकारला देण्यात येई. त्यातून साडेबारा, साडे बावीस टक्के मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आणि येथील आर्थिक उन्नतीच्या कारंज्याने आभाळ व्यापले. स्वाभाविकच डाव्या विचारसरणी पगडा असलेल्या समाजात दि. बा. नावाचा साथी अनेकांच्या हृदयात घर करून बसला.
दि. बा. पाटील हे राजकारणात भीष्माचार्य म्हणून राज्यात ओळखले जात असताना प्रारंभी मुंबई आणि पुढे महाराष्ट्रभर एक आवाज डाव्या विचारसरणीच्या विरोधात, कॉंग्रेसला पर्याय ठरावा अशा रितीने 'वसंत सेना' नावाची टीका सहन करत गुंजत राहिला. मुंबईतील हाजी मस्तान ते दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या काळ्याकुट्ट ताकदीला तो आवाज भेदत राहिला आणि मुंबई सुरक्षित ठेवली. अगदी 1992 च्या जातीयवादी दंगलीत आणि साखळी बॉम्बस्फोटातही. तो आवाज बाळासाहेबांचा होता. दोघेही त्यांच्या त्यांच्या सिंहासनावर समाजासाठी आरूढ झालेले. विचारसरणी भलेही भिन्न असेल पण तत्वाला ठाम चिकटलेले. आयुष्यभर एकमेकांविरोधात तलवारीला तलवार घासत विचाराने लढले. पुढे दोघांनीही तह करून तलवारी एकत्रच म्यान केल्या.
लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाताना, बिकनेवाले बहुत थे, हम खरीदने नही चाहते थे... असे सांगत सत्तेला आणि लाचारीला धुडकावत अटलबिहारी वाजपेयी यांनी हाती आलेल्या सत्तेचा त्याग करून नवा आदर्श घालून दिला. त्या आदर्शवादी पंतप्रधानांना स्वर्गीय आदरांजली अर्पण करण्याच्या विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याच्या विचारात आहे. वाजपेयी यांचे नाव दिल्याने भाजपातील मोदी विरोधकांची बोलती बंद होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजपेयी यांना असलेली मान्यता लक्षात घेता मोदी सरकारला पसंती वाढेल आणि राज्यातील ठाकरे सरकारवर आसूड ओढल्याचे समाधानही मिळेल अशी खेळी असल्याने राज्यातील भाजपा नेते केंद्र सरकारच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना आतून गुदगुल्या सुरू झाल्या आहेत. 
वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पद मिळवले असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रकल्पाला नाव देण्याचे स्वप्न उद्धव ठाकरे यांचे पूर्ण होऊ न देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ब्रह्मास्त्र म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव कलेने पुढे केले आहे.
भविष्यात भाजपसोबत शिवसेनेचा व्यवहार कसा राहील यावर नाव देण्याची भिस्त अवलंबून राहील असेही म्हटले जात आहे. सेना-भाजपाची राज्यात युती झाल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला भाजपाचा असलेला राजकीय विरोध मावळेल, यासाठी केंद्र सरकार फुंकून ताक पित आहे. त्यांनी अद्याप अटल बिहारी यांच्या नावाची घोषणा केली नसली तरी सेनेला कात्रीत पकडण्यासाठी, वाजपेयींच्या कवितेतील मथळ्याप्रमाणे कोशिश करनेवालो की कभी हार नही होती, या ओळींचा आधार घेत सरकारमध्ये फूट पाडून भाजपाच्या वळचणी शिवसेनेला आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
सध्या राज्यात दि. बां. पाटील की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शाब्दिक चकमकी झडत आहेत. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती उदयाला आली आहे. त्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी कच खाल्ली असल्याने दि. बां. चे नाव लोणच्यासारखे वापरणे सुरूच आहे. मनाने सत्तेत आणि शरीराने दि. बां. सोबत असलेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा घात केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विमानतळाला दि. बां. चे नाव देण्याची अस्मिता मागे पडली आहे. याला येथील राजकारण आणि नेत्यांची साठमारी कारणीभूत ठरत आहे. 

मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत ठराव...!

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दर्शविला आहे. सिडकोने केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत हा ठराव समंत करून केंद्र शासनाच्या हवाई मंत्रालयाला शिफारस करण्यात येणार आहे. ही तयारी पूर्ण झाल्याचा निरोप देवून शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना दि. बां. च्या नावाच्या आग्रहापासून दूर राहण्याचा कानमंत्र दिल्याने समितीमधून त्यांनी काढता पाय घेतल्याचे कळते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.