Type Here to Get Search Results !

बाबा हरदेवजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगायला शिकवले- सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज



मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित – समर्पण दिवस

टीम महामुंबई
 “बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवीयतेने युक्त होऊन जीवन जगण्याची कला शिकवली.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आलेल्या ‘समर्पण दिवस’ समागमामध्ये व्यक्त केले.

वर्ष 2016 मध्ये 13 मे या दिवशी बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन ते निराकार प्रभूमध्ये विलीन झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस निरंकारी जगतात ‘समर्पण दिवस’ म्हणून आयोजित केला जात असून बाबा हरदेवसिंहजी यांना समर्पित करण्यात येत आहे. 

बाबाजींच्या पावन स्मृतींना उजाळा देत सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी जगत आणि प्रभू प्रेमी सज्जनांना संबोधित करताना म्हटले, की आपण केवळ बाबाजींचे स्मितहास्य आठवले तरी आपल्याला केवढीतरी शीतलता मिळते. त्यांनी आपल्याला यथार्थ मनुष्य बनण्याची युक्ती शिकवली. तेव्हा आपण यथार्थ मनुष्य होऊन जीवन जगावे. कारण असेच भक्तीपूर्ण, प्रेममय आणि निराकार ईश्वराशी संलग्न राहून जगलेले जीवनच त्यांना प्रिय होते. त्यांच्या शिकवणूकीप्रमाणे जगून आपण आपले जीवन उज्ज्वल करावे, जेणेकरुन ही ज्ञानाची ज्योत घरोघरी पोहचू शकेल, जी त्यांची अभिलाषा होती.

बाबा हरदेवसिंहजी यांनी 36 वर्षे मिशनची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात मिशन 17 देशांपासून जगाच्या प्रत्येक महाद्वीपामध्ये 60 देशांमध्ये पोहचले. त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संत समागम, युवा संमेलने, सत्संग कार्यक्रम, समाजसेवा, विभिन्न धार्मिक व आध्यात्मिक सस्थांशी समन्वयात्मक आयोजने यांसारख्या आयोजनांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्र संघाकडून संत निरंकारी मिशनला सामाजिक व आर्थिक परिषदेचे सल्लागार म्हणून मान्यतादेखिल बाबाजींच्या कार्यकाळातच प्रदान करण्यात आली.

आध्यात्मिक जागृती व्यतिरिक्त समाजकल्याण क्षेत्रातसुद्धा बाबाजींनी अनेक यशस्वी पावलं टाकली. त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य, महिला सशक्तीकरण, शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे आदि उपक्रम राबविण्यासाठी केलेल्या कार्यांचा समावेश आहे.  याशिवाय बाबाजींनी स्वत: रक्तदान करुन मिशनचे रक्तदान अभियान सुरु केले. पुढे जाऊन विलेपार्ले, मुंबई येथे सुरु करण्यात आलेल्या मिशनच्या पहिल्या-वहिल्या रक्तपेढीचे लोकार्पणदेखिल 26 जानेवारी, 2016 रोजी बाबाजींच्या शुभहस्ते करण्यात आले.

बाबा हरदेवसिंहजी प्रेम आणि करूणेची सजीव मूर्ती होते. त्यामुळे ते प्रत्येक स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. संत निरंकारी मिशन हे त्याचेच प्रतिबिंब होय ज्यामध्ये विविध धर्म, जाती, वर्ण इत्यादींचे लोक समस्त भेदभाव विसरून प्रेम व शांतीपूर्ण सह-अस्तित्व यांसारखी मानवी मूल्ये जीवनात धारण करत आहेत.

त्यांच्याकडून जनकल्याणासाठी केल्या गेलेल्या सेवांचा आज एक सोनेरी इतिहास तयार झाला असून त्यांनी प्रशस्त केलेल्या पथावर अग्रेसर राहून भाविक भक्तगण त्यांची शिकवण लक्षात ठेवून त्यांचे अनुसरण करत आहेत. 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.