दिपेश मोहिते | मुंबई
आज दिनांक 1 मे 'महाराष्ट्र दिन' आणि आपण असे ही म्हणू शकतो महाराष्ट्राचा गौरव करण्याचा दिवस परंतु आज हा महाराष्ट्र करोना सारख्या महामारी च्या विळख्यात सापडलेला आहे.हे असून सुद्धा आपले पोलीस ,डॉक्टर्स ,महाराष्ट्र प्रशासन ह्या परस्थितीला एक जुटीने सामोरे जात आहेत.अशा ह्या वीरांना 'महा मुंबई' टीम चा सलाम आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र ह्या सगळ्यातून लवकरच बाहेर पडेल कारण असली संकटे महाराष्ट्रवर खूप वेळा येऊन गेलीत आणि महाराष्ट्र त्याला पुरून ही उरला .
म्हणून कुसुमाग्रज लिहितात
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात.
चला तर मग बघूया ह्या महाराष्ट्राला त्याचे नाव कसे मिळाले.
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.चक्र्धर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.
आता पाहूया १ मेलाच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो...?
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.
