२८ मे १८८३ रोजी या थोर नररत्नाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील 'भगूर ' येथे झाला. लहानपणापासूनच घोडेस्वारी', युद्धातील 'तलवार चालवणे' हे त्यांचे आवडते खेळ होते. सन १८९८ मध्ये वीर चापेकर हसत हसत फाशीवर गेले. चापेकरांच्या हौतात्म्यानं ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचार केला- आणि मारता, मारता मरेतो झुंजेन.' अशी देवीपुढे शपथ घेतली. इतक्या लहान वयात गंभीर शपथ घेणारे शिवाजीमहाराजांनंतर सावरकर हेच पहिले आहेत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारताच्या आधुनिक इतिहासातील चमत्कारच! या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वात इंद्रधनुष्याप्रमाणे अनेक रंग होते. महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, ज्वालाग्राही साहित्यिक, कुसुमकोमल कवी, थोर नाटककार, ओजस्वी इतिहासकार, तत्त्वनिष्ठ राजकारणी, प्रेरक वक्ता, धुरंधर सेनापती आणि खंदा समाजसुधारक. सावरकर एक शतपैलू रत्न होते. माझा आवडता पुढारी कोण असा विचार केल्यास सावरकरच माझ्या डोळ्यांसमोर येतील.
इतकेच नव्हे तर पदवी घेऊनही देशाच्या सेवेचा दंड म्हणून पदवी हिरावले गेलेले सावरकरच पहिले विद्यार्थी ! बॅरिस्टर होऊनही बॅरिस्टरची सनद द्यायला मात्र सरकारने नकार दिला असे पहिले बॅरिस्टर म्हणजे सावरकरच! सावरकरांचे नाव घेतले की, त्यांची त्रिखंडात गाजलेली समुद्रातील उडी आठवते. मोरिया बोटीच्या संडासातून मोठ्या ईर्षेने, जिद्दीने, समुद्रात उडी ठोकून बंदुकीच्या गोळ्यांचा मारा चुकवीत, पाण्यात पोहत जाणारे सावरकर फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर फ्रेंच पोलिसांच्या तावडीत सापडले.
स्वातंत्र्याच्या चळवळीत दोन जन्मठेपांची - काळी शिक्षा झालेले सावरकरच. तशा परिस्थितीत बंदीवासात महाकाव्य लिहिणारा पहिला महाकवी तेच! सावरकरांवाचन उभ्या जगात कोणी आहे का दुसरा ? रत्नागिरीत पतित-पावन मंदिरामध्ये अस्पृश्यता नाहीशी करण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर', 'माझी जन्मठेप', 'सहा सोनेरे पाने' ही पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अमोल ठेवाच ! सावरकरांचे नाव घेतले की, 'ने मजसी ने '- हे आर्त गीत व स्वतंत्रतादेवीचे स्तोत्र- 'जयोस्तुते '- आठवल्यावाचून राहात नाहीत.
सावरकरांनी हिंदू महासभेमध्ये भाग घेतला. सहा वेळा अध्यक्षस्थान भूषवले. हिंदुत्वाची त्यांची व्याख्या संकुचित नव्हती. वैज्ञानिक दृष्टिकोण असलेले विचारी व काळाच्या शंभर वर्षे पुढे पाहू शकणारे ते द्रष्टे होते. सावरकरांचं चरित्र भव्य-दिव्य आहे. नोबेल पारितोषिक विजेते श्री रमण म्हणतात, 'सावरकर म्हणजे मानवजातीला सत्यप्रकाश दाखवणारा एक अत्यंत तेजस्वी आणि जातिवंत हिरा आहे.
अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.
दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी तसे घडले.
भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.
त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.